चाळीसगाव (नासिर मुल्ला) : शिरसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील विविध मूलभूत प्रश्नांवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. शाळेतील पोषण आहार, स्मार्ट मीटर, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतकऱ्यांचा वीजप्रश्न, जल जीवन मिशनची पाणी योजना तसेच घरकुलाच्या लाभार्थ्यांचा प्रश्न यावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली व प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार नियमानुसार व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना दर्जेदार व नियमित पोषण आहार मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा विरोध
गावात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी स्मार्ट मीटरबाबत ग्रामस्थांच्या शंकांकडे लक्ष वेधले. गावात स्मार्ट मीटर बसवू नये, यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

वारंवार वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांचा संताप
गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शेतातील वीजपुरवठा वारंवार बंद करून पुरवठ्याच्या वेळेत बदल केला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पुरवठ्यात वारंवार बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऑटो स्विच काम करत नाही. व मोटारींच्या वायरिं मध्ये वारंवार बदल करावे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा ग्रामसभेत मांडण्यात आला.
शिरसगाव फिडरवर अतिरिक्त भार; स्वतंत्र फिडरची मागणी
शिरसगाव फिडरवर अतिरिक्त विद्युत भार असून, याच फिडरवरून टाकळी प्र.दे. व पिंपळवाड म्हाळसा या गावांनाही वीजपुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वारंवार वीज खंडित होत असून, शिरसगावसाठी स्वतंत्र स्पेशल फिडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

जल जीवन मिशनच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह
गावातील पाणीप्रश्नावरही ग्रामसभेत तीव्र चर्चा झाली. जल जीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे पाणी नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच जल जीवन मिशनची पाइपलाइन अद्याप गावातील सर्व भागात जोडण्यात आलेली नसल्याने योजनेचा अपेक्षित लाभ ग्रामस्थांना मिळत नसल्याचे सांगण्यात आले. गावाला नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी
गावातील पात्र व गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, तसेच यादीत नावे नसलेल्या पात्र लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामसभेला माझी सरपंच, माझी उपसरपंच, माझी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकिय अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे सबस्टेशन उप अभियंता, न्यू इंग्लिश शाळे चे मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक, तलाठी,कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच इतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.








