आयुर्वेदीक गोळ्यांच्या नावाखाली सुरु होती तस्करी; इंदूरच्या कंपनीसह तिघांवर गुन्हा दाखल
धुळे (सनी सोनवणे):
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या मादक पदार्थांची (भांग) तस्करी करणाऱ्या एका कंटेनरवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १७५ किलो ‘भांगच्या सणन पाचक वटी’ (गोळ्या) जप्त करण्यात आल्या असून, कंटेनरसह एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भांगच्या गोळ्या ‘आयुर्वेदिक चूर्ण गोळी’ असा बनावट लेबल लावून दिशाभूल करत विकल्या जात होत्या. याप्रकरणी चालक, खरेदीदार आणि इंदूर येथील कंपनीवर सोनगीर पोलीस ठाण्यातc गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा रचला सापळा:
दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मुंबई-आग्रा महामार्ग क्र. ३ वरून मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरमध्ये (MP-09/GG-3199) मादक पदार्थांची तस्करी होत आहे. या माहितीच्या आधारे धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनगीर टोल नाक्यावर सापळा रचला.
कंटेनर येताच पथकाने त्याला अडवून चालक मोहम्मद साबीर मुशरफ खान (वय ४७, रा. पवनपुरी, पालदा, इंदूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. कंटेनरची झडती घेतली असता आतमध्ये मादक पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
बनावट लेबल लावून दिशाभूल:
आरोपींनी संगनमत करून शासनाची व पोलिसांची फसवणूक करण्यासाठी मादक पदार्थ असलेल्या भांगच्या डब्यांवर ‘आयुर्वेदिक चूर्ण गोळी, पाचक वटी चूर्ण गोळी’ असे लेबल लावले होते. पोलिसांनी ५ प्लॅस्टिकच्या गोण्यांमधील १० कागदी खोक्यांमध्ये एकूण २०० डबे (एका डब्यामध्ये ८७५ ग्रॅम) असा तब्बल १७५ किलोचा मादक पदार्थ (भांग सणन पाचक वटी) जप्त केला. याची बाजारातील किंमत ४ लाख रुपये आहे. यासोबतच १५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
याप्रकरणी अवैधरित्या मादक पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि बनावटीकरण केल्याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात खालील तिघांवर बीएनएस कलम ३१८(३), ३३६(३), ३४०(२) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ), ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. मोहम्मद साबीर मुशरफ खान (कंटेनर चालक, रा. इंदूर)
२. मेहता आयुर्वेदिक संस्थान, सणन हाऊस, इंदूर (कंपनी, मध्य प्रदेश)
३. इरफान मकबुल शेख (खरेदीदार, रा. अहिल्यानगर)
कारवाईतील पथक:
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि दिपक ढोके, तसेच पोलीस अंमलदार संतोष जाधव, राहुल सानप, आरिफ पठाण, शिरीष भदाणे व सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.








