धुळे: शिरपूर तालुक्यातील सांगवी वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राहुल रामदास बहिरम (वय ३०) याला १५०० रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई ८ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.
सविस्तर वृत्तानुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांना उदरनिर्वाहासाठी वनविभागाकडून राष्ट्रीय शेतजमीन मिळाली आहे. शासनाकडून शिरपूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला असल्याने, दुष्काळी निधी मिळण्यासाठी ‘जे’ फॉर्मची (वनहक्काचे दस्तऐवज) आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या वकाड गावातील इतर १४ शेतकऱ्यांनी सांगवी वन परिक्षेत्र कार्यालयात वनरक्षक राहुल बहिरम याच्याकडे अर्ज जमा केले होते. या अर्जांच्या विचारपुशीसाठी तक्रारदार गेले असता, वनरक्षक बहिरम याने प्रत्येक फॉर्मसाठी १०० रुपये याप्रमाणे १५ फॉर्मचे एकूण १५०० रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने धुळे एसीबीकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीची ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान आरोपी राहुल बहिरम याने पंचासमक्ष १५०० रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याच दिवशी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली आणि लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात (गु.र.नं. २८७/२०२६) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. मूळचा साक्री तालुक्यातील भवरीविहीर येथील रहिवासी असलेला आरोपी राहुल बहिरम हा सध्या सांगवी येथील वन विभागाच्या शासकीय निवासस्थानात राहत होता.
ही कारवाई नाशिक ला.प्र.वि. चे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रदिप मैराळे, आणि श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धुळे ला.प्र.वि. चे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कहाळ, तसेच सापळा पथकातील स.फौ. राजन कदम, पो.हवा. मुकेश आहिरे, मकरंद पाटील, आणि रामदास बारेला यांनी ही कारवाई यशस्वी केली.








