दिव्यांग मित्र अभियानांतर्गत उपक्रम; मान्यवर महिलांचा सन्मान, दिव्यांगांना साहित्य व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
चाळीसगाव (नासिर मुल्ला) : दिव्यांग मित्र अभियानांतर्गत सेवा सहयोग ग्रामोदय कार्यक्रम आणि अपंग विकास बहुउद्देशीय संस्था, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राम्हणशेवगे येथे कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि गरजूंसाठी जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले (मेहुनबारे पोलीस स्टेशन), वनपरिक्षेत्र अधिकारी नीलम महाडिक (सामाजिक वनीकरण, चाळीसगाव), मीनाक्षी निकम (अध्यक्ष, स्वयंदीप अपंग बहुउद्देशीय संस्था, चाळीसगाव), सुनीता पवार (संचालिका, सरस्वती हॉस्पिटल, चाळीसगाव) आणि सुचित्रा पाटील (अध्यक्ष, हिरकणी महिला मंडळ) यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवर महिलांचा कर्तृत्ववान नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला.
प्रत्येक महिलेचा सन्मान व्हायला हवा – सह्याद्री बिर्ले
यावेळी मार्गदर्शन करताना सह्याद्री बिर्ले म्हणाले की, केवळ कर्तृत्ववान नवदुर्गांचाच नव्हे, तर प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन करून सातत्याने अभ्यास करावा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे – नीलम महाडिक
नीलम महाडिक यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न करावेत, असे सांगितले. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा – मीनाक्षी निकम
मीनाक्षी निकम यांनी विद्यार्थ्यांनी डॉक्टर, पोलीस अधिकारी यांसारख्या विविध क्षेत्रांत उच्च पदांवर पोहोचण्याचे ध्येय ठेवून मेहनत घ्यावी, असे सांगितले. मानवसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून समाजसेवेसाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महिलांनी प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. तसेच गावातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, महिलांनी संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, महिला आणि पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.








