चाळीसगाव (नासिर मुल्ला)
शिरसगाव येथील SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी आपले नाव, पत्ता, वय, जन्मतारीख, छायाचित्र, EPIC क्रमांक तसेच मतदान केंद्राची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादीबाबत 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी व निराकरणाची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

नाव यादीत आहे का, तपासा
प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे का, नावाची स्पेलिंग योग्य आहे का, वडिलांचे किंवा पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो योग्य आहे का, तसेच EPIC क्रमांक व मतदान केंद्राची माहिती अचूक आहे का, याची प्रत्येक मतदाराने खात्री करावी.
विशेषतः कुटुंबातील वृद्ध व्यक्ती, शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेर गेलेले सदस्य, स्थलांतरित मतदार तसेच SIR प्रक्रियेत पडताळणी न झालेले मतदार यांच्या नावांची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाव गायब असल्यास घाबरू नका
प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नसल्याने नाव वगळले गेले असल्यास मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत दावा दाखल करून नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे.
नवीन नाव नोंदणी किंवा वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह Form 6 दाखल करता येईल. तसेच नाव, पत्ता, वय, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये चूक असल्यास Form 8 द्वारे दुरुस्तीची मागणी करता येणार आहे.
2025 मध्ये नाव होते, मात्र 2026 च्या प्रारूप यादीत नाही?
2025 च्या मतदार यादीत नाव असतानाही 2026 च्या SIR प्रारूप यादीत नाव आढळत नसल्यास महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या SIR पोर्टलवरील ASDD (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणी सुविधेद्वारे संबंधित नोंद तपासता येणार आहे.
मतदारांनी अंतिम यादीची वाट न पाहता प्रारूप यादीत नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांसाठी महत्त्वाचे
मतदारांनी आधारकार्ड, जन्मतारीखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, 2025 च्या मतदार यादीतील नावाचा तपशील किंवा त्याचा फोटो/स्क्रीनशॉट आणि आवश्यक इतर कागदपत्रे तयार ठेवावीत. आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदाराचे नाव स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.






