धुळे:‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न अन् औषध प्रशासन (FDA) आणि धुळे तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर १६ लाख ५२ हजार १०० रुपये किमतीचा सुमारे ५,३८५ किलो संशयास्पद मावा (खवा) जप्त केला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

अहमदाबादकडून अकोल्याकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसमधून (MP-44-ZF-7214) मिठाई बनवण्यासाठी लागणाऱ्या खव्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि धुळे तालुका पोलीस कर्मचाऱ्यांनी साक्री रस्त्यावरील मोराणे हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ पाळत ठेवून सदर वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. पुढील कारवाईसाठी हे वाहन महामार्गावरील टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे आणण्यात आले.

१३ ब्रँड्सचा साठा जप्त
या वाहनातून प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), गणेशा, नंदी, खोडल, श्री ग्वाल, श्री गोकुळ, गोपाल, कृष्णा हलवा, मीरा आदी १३ विविध कंपन्यांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. भेसळीच्या संशयावरून एकूण ५,३८५ किलोचा साठा जप्त करून कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या सर्व पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी वाहनातील चालक जगदीश मानजी पाटीदार व महेंद्रसिंग परबतसिंग राठोड, तसेच क्लिनर राजकुमार रोशनलाल आचार्य (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.

या पथकाने केली कारवाई
नाशिक विभागाचे सह-आयुक्त मंगेश माने व सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार (सर्व अन्न व औषध प्रशासन, धुळे) तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाकीदा सय्यद, पोलीस अंमलदार सतीश कोठावदे व पंकज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.









