धुळे:धुळे जिल्हा कारागृह वर्ग-१ च्या खुल्या कारागृहातील शेती विभागात काम करत असलेला एक शिक्षाबंदी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पसार झाल्याची घटना बुधवारी (दि. २३ सप्टेंबर २०२६) दुपारी घडली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा अशोक वाघ (शिक्षा बंदी क्रमांक सी/११७) ऊर्फ दाद्या असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. तो गेल्या एका वर्षापासून कारागृह मालकीच्या शेती विभागात नियमितपणे काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी कारागृहाच्या शेती विभागात (नावडीबाग) काम करण्यासाठी दाद्यासह इतर १० शिक्षाबंदींना बाहेर काढण्यात आले होते. दुपारी २:०० वाजेच्या सुमारास कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना दाद्या शेतात नसल्याचे लक्षात आले. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिसरात शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही.
कारागृहाचा शेती विभाग शहरातील मुख्य रहदारीच्या परिसरात असून, लागूनच मुख्य रस्ता व बस स्टँड आहे. या परिस्थितीचा फायदा घेत बंदीने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केल्याचेc सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात BNS २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून फरार कैद्याचा शोध सुरू आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती धुळे जिल्हा कारागृह वर्ग-१ चे अधीक्षक ई. जी. शिंदे यांनी दिली आहे.








