प्रतिनिधी | धुळे
घरून रात्री बाहेर पडलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पांझरा नदीपात्रात आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवपूर परिसरातील नॅशनल हायवे क्रमांक ३ जवळील बिलाडी गावाच्या शिवारात पांझरा नदीच्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ आझाद नगर पोलिस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मृतदेहाची ओळख पटली
पोलिसांनी पंचनामा करत मृतदेहाची ओळख पटवली असता, मृत तरुण हा देवपूर येथील एकविरा देवी मंदिराजवळील बापू भंडारी गल्लीचा रहिवासी कृष्णा लक्ष्मण चौधरी (वय २३) असल्याचे निष्पन्न झाले. कृष्णा हा आदल्या रात्री घरातून बाहेर पडला होता, त्यानंतर तो परतलाच नाही.
घातपाताची चर्चा, पोलिस तपास सुरू
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमन) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात सध्यातरी आकस्मिक मृत्यूची (अकस्मात मृत्यू) प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा चौधरी याचा मृत्यू पाण्यात बुडून अपघाती झाला आहे की त्यामागे काही घातपात आहे, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, तो राहत असलेल्या बापू भंडारी गल्ली व देवपूर परिसरात त्याचा घातपात झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेमागचे सत्य शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येणार आहे.








