धुळे: शहरातील मनोहर टॉकीज परिसरात चायनीज स्टॉलवर दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अतिशय वेगाने तपास करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून गावठी कट्टा (पिस्तूल) आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:०० वाजेच्या दरम्यान मनोहर टॉकीजजवळील नाटेश्वर इलेक्ट्रिक दुकानासमोरील चायनीज स्टॉलवर ही घटना घडली. फिर्यादी हर्षल दीपक गवळी हे चायनीज स्टॉलवर विक्री करत असताना, दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून आरोपी वैभव मेकले, भावेश कौलसकर, हृषिकेश मोरे, भूषण लोधी, नकुल रगडे, विवेक गवळी, प्रथमेश भोंडवे आणि पंकज मेकले (सर्व रा. धुळे) यांनी संघटितपणे कट रचून फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच परिसरात दहशत निर्माण करत फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केला. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२७/२०२६ नुसार बीएनएस (BNS) आणि भारतीय हत्यार कायद्यांतर्गत (आर्म ॲक्ट क. ३/२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांची व व्यापाऱ्यांची पळापळ झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व आझादनगर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली.
प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी वैभव ऊर्फ गोलू संजय मेकले (वय २४) आणि भूपेश ऊर्फ भूषण तिलकंसिंग लोधी (वय २३, दोघे रा. अमरनगर, मनोहर टॉकीजमागे, धुळे) यांना ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल:
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ४०,००० रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा (मॅगझीनसह) आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना धुळे शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी:
अटक करण्यात आलेला आरोपी वैभव संजय मेकले याच्यावर यापूर्वी आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि आणि बीएनएस कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, या गुन्ह्यातील आणखी एक फरार आरोपी भावेश अनिल कौलसकर (वय २२) याच्यावरही आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि दीपक ढोके आणि त्यांच्या पथकातील अंमलदार मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ, मायूस सोनवणे, दिनेश परदेशी, शिरीष भदाणे, राहुल सानप, आरिफ पठाण, धर्मेंद्र मोहिते, नरेंद्र गिरासे, सचिन गोमसाळे व सुशील शेंडे यांनी केली आहे.








