५९ हजार रुपयांचा गूळ आणि शेंगदाणा तेल जप्त
धुळे (आकाश सोनवणे ):
राज्य शासनाच्या ‘सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा व स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी अन्न प्रशासनाने धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध अन्न आस्थापनांची अचानक पाहणी करण्यात येऊन संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान धुळे शहरातील उसगल्ली येथील ‘मे. नितीन तोलाराम उत्सव’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. या ठिकाणाहून गुळाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले असून, भेसळीच्या संशयावरून 59,390 रुपये किमतीचा 898 किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
तसेच, एमआयडीसी अवधान येथील ‘मे. नेहा इंडस्ट्रीज’वर छापा टाकून शेंगदाणा तेलाची तपासणी करण्यात आली. तेथून तेलाचे नमुने संकलित करून 19,920 रुपये किमतीच्या 89 बाटल्यांचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई
जप्त करण्यात आलेले अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

कारवाई पथक
ही धडक कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे, सुवर्णा महाजन तसेच अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने पार पाडली.
नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न सुरक्षा विभागामार्फत जिल्ह्यात अशी तपासणी सत्रे व कारवाई यापुढेही तीव्रतेने सुरू राहील, असा इशारा अन्न प्रशासनाने दिला आहे.







