आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या वर्षभराच्या पाठपुराव्याला यश; ३०-३५ वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटला
धुळे:महानगरपालिकेत तब्बल ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या १३६ बदली सफाई कामगारांना मंजूर व रिक्त पदांवर कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मंगळवारी (ता. १८) मुंबईत पार पडलेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामगारांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
धुळे महापालिकेत सेवा देणाऱ्या या १३६ बदली सफाई कामगारांनी काही महिन्यांपूर्वी आमदार अनुपभैया अग्रवाल यांची भेट घेऊन महापालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत निवेदन दिले होते. या कामगारांपैकी बहुतेकांनी वयोमर्यादा ओलांडली असल्याने त्यांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि आस्थापना खर्चाच्या अटींमध्ये विशेष बाब म्हणून शिथिलता देऊन त्यांना कायम करावे, असा प्रस्ताव आमदार अग्रवाल यांनी नगरविकास विभागाकडे दिला होता.

मंगळवारी आमदार अग्रवाल यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. कामगारांची प्रदीर्घ सेवा आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आणि १३६ कामगारांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला.
”धुळे महापालिकेत गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून हे कामगार सेवा देत होते. त्यांना कायम करण्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. वर्षभरापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाकडे याचा पाठपुरावा सुरू होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेत १३६ कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यावर शिक्कामोर्तब केले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”
— अनुपभैया अग्रवाल, आमदार, धुळे शहर
या निर्णयामुळे गेल्या अनेक दशकांपासून कायमसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या १३६ सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.








