अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे;शिवरे येथील ग्रामसेवकाच्या मृत्यूनंतर संताप
धुळे (प्रतिनिधी):ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्याविषयी सोशल मीडियावर (विशेषतः इन्स्टाग्रामवर) चुकीची व बदनामीकारक माहिती पसरवून गावातील शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर केवळ ‘फेमस’ होण्यासाठी अनेक जण कोणतीही सत्यता न पडताळता, अपूर्ण माहितीच्या आधारे रील्स बनवतात. छुप्या पद्धतीने व्हिडिओ काढणे, कागदपत्रांची शहानिशा न करता ते सोशल मीडियावर व्हायरल करणे असे प्रकार वाढले आहेत. यामुळे ग्रामसभा किंवा गावातील बैठकांमध्ये अकारण गोंधळ आणि मोठे वाद निर्माण होत आहेत.ग्रामसेवकाच्या मृत्यूचा संदर्भ:या निवेदनात जळगाव जिल्ह्यातील पारोळाv तालुक्यातील शिवरे गावातील एका अत्यंत दुर्दैवी घटनेचा संदर्भ देण्यात आला आहे. तिथे ग्रामसभेमध्ये झालेल्या वादानंतर आणि अशाच मानसिक त्रासामुळे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, त्यांच्या मुलांवर पोरके होण्याची वेळ आली आहे. अशा समाजकंटकांमुळे अधिकाऱ्यांचे नाहक बळी जात असल्याचा तीव्र संताप सरपंच परिषदेने व्यक्त केला आहे.निवेदनातील प्रमुख मागण्या:लोकशाहीत असलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून कोणाच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई व्हावी.गावागावात खोटी माहिती पसरवणारे इन्स्टाग्राम रील मेकर आणि व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन यांच्यावर स्थानिक पोलीस स्टेशन व पोलीस पाटील यांच्यामार्फत विशेष लक्ष ठेवण्यात यावे.’गावगाडा चालवताना सर्वच अधिकारी व सरपंच भ्रष्ट नसतात’, त्यामुळे अशा उपद्रवी लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.हे निवेदन देताना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश गुलाबराव पाटील यांच्यासह महेंद्र सूर्यवंशी (उपसरपंच), मनीषा खैरनार (सरपंच, वडगाव), संतोष राजपूत (सरपंच, बाबरे), मानसी देवरे (सरपंच, वडजाई), गायत्री देवी जयस्वाल (सरपंच, नेर), निलेश सोनवणे (सरपंच, आर्णी) आणि रुपाली पाटील (सरपंच, गरताड) आदी उपस्थित होते.









