विशेष प्रतिनिधी : १६ ऑगस्ट: काल देशभरात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अधिकृतरीत्या ‘ड्राय डे’ (दारूबंदी) घोषित करण्यात आला होता. मात्र, शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये या आदेशाला केराची टोपली दाखवत खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात भर म्हणजे, कारवाईसाठी आलेल्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना पाहून चक्क पळ काढल्याने या संपूर्ण प्रकरणामागे मोठे साटेलोटे असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
नेमका प्रकार काय?
स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे वार्तांकन आणि बातमी संकलनाची धावपळ संपवून सायंकाळी काही पत्रकार शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. ‘ड्राय डे’ असतानाही या हॉटेलमध्ये राजरोसपणे दारूची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.अधिकारी आले, पण कारवाईविना परतलेहा प्रकार सुरू असतानाच योगायोगाने त्या ठिकाणी दारूबंदी विभागाची गाडी दाखल झाली. या गाडीत डीवायएसपी (DySP) दर्जाचे अधिकारी आणि काही कर्मचारी उपस्थित होते. त्यातील एक कर्मचारी हॉटेलमध्ये शिरला. मात्र, समोर पत्रकारांना बसलेले पाहून त्याचा उद्देश काहीही असला तरी, तो कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी बाहेर पडला.
पत्रकारांनी जाब विचारताच अधिकाऱ्यांची पळता भुई थोडी
संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हा संशयास्पद प्रकार पाहून पत्रकारांनी तात्काळ हॉटेलबाहेर जाऊन त्यांच्या गाडीजवळ धाव घेतली. “हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री सुरू असताना तुम्ही कारवाई का करत नाही? इथून पळ का काढत आहात?” अशी विचारणा पत्रकारांनी केली. त्यावर उडवाउडवीची दोन शब्दांत उत्तरे देऊन या अधिकाऱ्यांनी तेथून थेट पळ काढला.
वेशभूषेवरून शंकांना उधाण
सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी कर्तव्यावर असतानाही हे अधिकारी आणि कर्मचारी गणवेशात नव्हते. डीवायएसपींसह सर्व कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट आणि नाईट पँट (ट्रॅक पँट) परिधान केली होती.स्वातंत्र्यदिनी कर्तव्यावर असताना अधिकाऱ्यांनी गणवेश का परिधान केला नव्हता?
हॉटेलमध्ये दारू विक्री सुरू असल्याचे माहीत असूनही कारवाई का केली नाही?अधिकारी तिथे नक्की कारवाईसाठी आले होते की ‘हप्ता’ वसुलीसाठी..?पत्रकारांना पाहून अधिकाऱ्यांनी पळ का काढला?
वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणी
एकीकडे शासन ‘ड्राय डे’ची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देते, तर दुसरीकडे तेच आदेश राबवणारे अधिकारी अशा संशयास्पद स्थितीत वावरत असतील, तर कायद्याचा धाक राहिलाच कुठे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.








