धुळे:हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०१ व्या जयंती (ईद-ए-मिलादुन्नबी) निमित्त धुळे शहरात अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. या सामाजिक व धार्मिक औचित्यावर ‘नूर ए स्टार फाउंडेशन’च्या वतीने १०० फुटी रोडवरील सीमा हॉल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजेपासूनच या शिबीराला धुळेकर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि रक्ताचा तुटवडा भासू नये, या उदात्त उद्देशाने नूर ए स्टार फाउंडेशन दरवर्षी ईद मिलादुन्नबीच्या दिवशी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करते. यंदाच्या शिबीरात संकलित केलेल्या रक्ताच्या पिशव्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आल्या.
शिबीराच्या सुरुवातीपासूनच रक्तदात्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ५० हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले होते, तर सायंकाळपर्यंत सुमारे २०० युनिट रक्त संकलित होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नूर ए स्टार फाउंडेशनचे अध्यक्ष समीर खान पठाण, उपाध्यक्ष हबीब पठाण, खजिनदार आक्रम सय्यद, सचिव रमजान सय्यद तसेच राजदार पठाण, इकबाल शेख, लाला सैय्यद, अशपाक माणियार, इकबाल गुलाब शेख, असलम पठाण, अफरीज पठाण, मुस्ताक सैयद, सुलतान सैय्यद, हफिज पठाण, मुन्ना सैय्यद, फिरोज सैय्यद, अरिफ शेख आणि असिफ शेख यांच्यासह फाउंडेशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणार्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.









