धुळे (प्रतिनिधी):परमपूज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री दत्त देवस्थान (अहिल्यानगर) अंकित ‘श्री सद्गुरू सत्संग मंडळ, धुळे-जळगाव’ यांच्या वतीने धुळे शहरात दिनांक १४, १५ आणि १६ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सामूहिक ग्रंथ प्रसार सेवेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, या सामूहिक प्रसार सेवेअंतर्गत प. पू. सद्गुरूंनी सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणींवर केलेले मार्गदर्शन असलेली ‘गुरुवाणी’, ‘अमृत कलश’ व इतर महत्त्वपूर्ण ग्रंथ साहित्याचा प्रसार करण्यात येणार आहे. तसेच, श्री दत्त देवस्थानात सुरू असलेल्या ‘वेद कार्याचा’ भक्तांमार्फत घरोघरी जाऊन प्रसार केला जाईल, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अध्यात्मिक विचार पोहोचू शकेल.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक १४, १५ आणि १६ ऑगस्ट २०२६ रोजी देवपूर येथील श्री स्वामीनारायण मंदिर (गेट नं. ४, दत्त मंदिर चौक, धुळे) येथे प. पू. सद्गुरूंचे अधिष्ठान भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.
या पत्रकार परिषदेला प्रसार सेवेचे अध्यक्ष श्री. रोहिदास पाटील आणि श्री सद्गुरू सत्संग मंडळ (धुळे-जळगाव) चे अध्यक्ष श्री. गजानन बयाणी उपस्थित होते. धुळेकर नागरिकांनी आणि भाविकांनी या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा व दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री. योगेश संन्यासी यांच्याशी संपर्क साधण्याचेही यावेळी सांगण्यात आले.








