धुळे, ता. ११ : आजच्या काळात प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात शहरातील ४ शाळांतील ३००० हून अधिक सावित्रीच्या लेकींना लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शिस्त आणि आत्मरक्षणाची जाणीव निर्माण होऊन त्या अधिक सक्षम नागरिक म्हणून घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना संघटनेच्या प्रदेश सहसंयोजिका अल्पा अग्रवाल म्हणाल्या की, राज्यासह देशभरात लहान मुली, विद्यार्थिनींसह युवतींवर अन्याय-अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. यातून अनेक मुलींचे आयुष्य पणाला लागत आहे. या पार्श्वभूमीवर लहान वयातच मुलींना आत्मनिर्भर तसेच ‘रणरागिणी’ बनविण्यासाठी, त्यांना किमान स्वतःचे संरक्षण करता येईल, त्यांच्या मनात तसा आत्मविश्वास निर्माण होईल व ती सशक्त होईल, यासाठी भाजपच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाच्या माध्यमातून शहरातील शालेय विद्यार्थिनींसह युवतींना लाठी-काठी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला.

सशक्त मुलगी म्हणजे सशक्त कुटुंब, सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र. विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच त्यांच्यात तसा आत्मविश्वास निर्माण होऊन त्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सक्षम होण्यास मदत होईल, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सौ. अग्रवाल यांनी सांगितले.
४ शाळांमध्ये ३००० मुलींना प्रशिक्षण
अल्पा अग्रवाल यांच्यासह अभियानाच्या धुळे जिल्हा संयोजिका कुंतल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वात शहरातील चावरा इंग्लिश स्कूल, कमलाबाई कन्या शाळा, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल व कमलाबाई अजमेरा कन्या विद्यालय या चार शाळांतील सुमारे ३००० विद्यार्थिनींना तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक भिकाजी जाधव, ऋतुजा जाधव आणि नारायणी जाधव यांनी लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण दिले. लाठी-काठी प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनींना मेहंदी, तसेच परिचारिकांना ‘एआय’ संदर्भातही प्रशिक्षण देण्यात आले.
चावरा इंग्लिश स्कूल: ५०० हून अधिक विद्यार्थिनी प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. यावेळी सौ. अग्रवाल, कुंतल अग्रवाल, प्रिन्सिपल फादर सी. जो., व्हाइस प्रिन्सिपल फादर जेरीन, शिक्षिका शीतल पल्हानी, अस्मिता फर्नांडिस, वंदना घुंडियाल, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.
कमलाबाई कन्या शाळा: १५०० विद्यार्थिनींनी लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कचरदास नाबरिया, उपाध्यक्ष नंदलाल रुणवाल, सचिव शिल्पा म्हसकर, संतोष अग्रवाल, मुख्याध्यापिका छाया नाईक उपस्थित होते.
पोद्दार इंग्लिश स्कूल: ५०० विद्यार्थिनींनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. यावेळी अल्पा अग्रवाल, कुंतल अग्रवाल, शाळेचे प्रिन्सिपल भूषण उपासनी, व्हाइस प्रिन्सिपल राखी अग्रवाल, शिक्षिका प्रियांका पवार, बिंदू यादव, श्रुती अहिरे, प्रांजली जोशी उपस्थित होत्या.
कमलाबाई अजमेरा कन्या विद्यालय: ५०० विद्यार्थिनी प्रशिक्षणात सहभागी झाल्या. मुख्याध्यापक पंकजकुमार सूर्यवंशी, मुकेश कांगणे, श्याम चौधरी, स्वप्नील पाटील, उमेश पाटील, प्रवीण पगारे, हेमलता पाटील, मानसी बोरसे आदी उपस्थित होते.
‘बेटी बचाओ–बेटी पढाओ’ अभियानातर्फे १५ दिवस चाललेल्या या उपक्रमात सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. पंकज पाटील यांनी या उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले.
“कुठलाही अपप्रसंग ओढवला, तर प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनली पाहिजे, तिला स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध शाळांमध्ये लाठी-काठी प्रशिक्षणासोबतच मुलींच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शहरातील विविध शाळांतील तीन हजारांहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यातून विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शिस्त आणि आत्मरक्षणाची जाणीव निर्माण होऊन त्या अधिक सक्षम नागरिक म्हणून घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.”

- अल्पा अनुप अग्रवाल, प्रदेश सहसंयोजिका, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, भाजप








