बाळापूरचा तलाठी फरार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
धुळे:
बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना धुळे तालुक्यातील एका तलाठ्यासह एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. ८) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आणखी एक तलाठी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दिनेश दिगंबर दाभाडे (वय ४०, ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, मोहाडी, अति. कार्यभार फागणे, ता. जि. धुळे) आणि जयेश कैलास चौधरी (वय ३९, खाजगी इसम) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर मृणाल शरद नेरपगारे (ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, बाळापूर, ता. जि. धुळे) हा फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय तक्रारदाराचा बांधकाम मटेरियल वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे ट्रॅक्टर धुळे शहरातील साक्री रोडवरील मोती नाल्याजवळून जात असताना तलाठी दाभाडे, नेरपगारे व गायकवाड यांनी ते थांबवले. त्यांनी तक्रारदाराला फोन करून धुळे शहरातील माळेगाव चौफुली येथे बोलावून घेतले. “तुला जर तुझ्या ट्रॅक्टरने वाहतूक करायची असेल तर २० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुझ्या वाहनावर अवैध गौणखनिजाचा गुन्हा दाखल करू,” अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर तडजोडीअंती लाचेची रक्कम १२ हजार रुपये निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ७ सप्टेंबर रोजी धुळे एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्याच दिवशी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यात तलाठी दाभाडे याने खाजगी इसम चौधरी याच्यामार्फत १२ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी खाजगी इसम जयेश चौधरी याने तक्रारदाराकडून १२ हजारांची रक्कम स्वीकारली आणि ती तलाठी दाभाडे याच्याकडे दिली. लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रदिप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्याचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकातील स.फौ. राजन कदम, पोहेकॉ मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, चौधरी आणि सुधीर मोरे यांनी केली आहे.







