धुळे: नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील बहुचर्चित खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाला होता.
घटनेची थोडक्यात माहिती
दिनांक ५ जुलै २०२३ रोजी दुपारी नरडाणा येथील भिल्ल वस्तीत मयत गजराज उर्फ गज्या सोमनाथ लिंगायत आणि आरोपी विशाल उर्फ चिक्कू दगडू नेतले यांच्यात दारू पिण्यासाठी पैसे देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. या वादात मयताने मारलेला काचेचा ग्लास लागल्याने आरोपी दुखापतग्रस्त झाला होता. याच पूर्वकोपापोटी आरोपीने फळ विक्रेत्याच्या दुकानातील लोखंडी सुरा सोबत घेऊन मयताचे घर गाठले आणि त्याच्या मानेवर, पोटावर व छातीवर वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान ६ जुलै २०२३ रोजी सकाळी मयताचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचा भाऊ नकुल सोमनाथ लिंगायत यांच्या फिर्यादीवरून नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल व शिक्षा
मा. जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. जे. गायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
भारतीय दंड संहिता (भादवि) कलम ३०२: जन्मठेप, १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्त मजुरी).
भारतीय दंड संहिता (भादवि) कलम ४५२: ५ वर्षांची तुरुंगवास शिक्षा, ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्त मजुरी).
खटल्यात सरकार पक्षातर्फे तत्कालीन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील यांनी काम पाहिले, तर त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर व पैरवी अधिकारी पोहेकॉ निरंजन साळुंखे यांचे सहकार्य लाभले.








