धुळे / सनी सोनवणे :
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ईश्वर पाटील यांना मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांवर खातेनिहाय कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात (गेस्ट हाऊस) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “संबंधित पोलीस निरीक्षकाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच जर शेतकरी प्रतिनिधींना अशा प्रकारे अमानुष मारहाण होत असेल, तर हे अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय आहे, असे तुपकर म्हणाले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी अधिकाऱ्यावर प्रशासनाकडून लवकरात लवकर कडक कारवाई आणि निलंबनाची पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिले. जर या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, तर शेतकरी संघटना आक्रमक पवित्र घेईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.









