धुळे : धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला जादूटोणा, अपहरण व डांबून ठेवल्याचा गुन्हा पूर्णपणे खोटा, निराधार आणि आर्थिक फसवणूक लपवण्यासाठी रचलेला बनाव असल्याचा आरोप सौ. अरुणा पद्माकर पारखे यांनी केला आहे. या प्रकरणात मूळ फिर्यादी महिलेने ३ लाख ५० हजार रुपयांची देणी बुडवण्यासाठी हा कट रचल्याचे सांगत, संबंधित घटनेचे डिजिटल व कायदेशीर पुरावे त्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
प्रसन्न हौसिंग सोसायटी, गोळीबार टेकडी रोड येथील रहिवासी अरुणा पद्माकर पारखे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. २७ सप्टेंबर रोजी यशोदा अनिल गायकवाड नामक महिलेने अरुणा पारखे व त्यांच्या मुलीविरोधात जादूटोणा करून मुलीचा बळजबरीने विवाह लावल्याचा व अपहरण करून डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपांचे खंडन करताना पारखे यांनी सांगितले की, फिर्यादी महिलेचे खरे नाव यशोदा उर्फ सोनाली मंगल गुजर असे असून, तिने पहिल्या पतीच्या निधनानंतर एप्रिल २०२५ मध्ये दुसरे रजिस्टर लग्न केले होते. मात्र, तिने पोलिसांत तक्रार देताना १५ वर्षांपूर्वी मयत झालेल्या पहिल्या पतीचे नाव लावून दिशाभूल केली.

हातउसनवार घेतलेले पैसे बुडवण्याचा डाव
पारखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांच्या ओळखीमुळे सोनाली हिने तिच्या मुलीच्या लग्नासाठी व कर्जापोटी वारंवार आर्थिक मदत मागितली होती. दागिन्यांवर कर्ज काढून तिला ‘फोनपे’द्वारे सुमारे ३ लाख ५० हजार रुपये हातउसनवार देण्यात आले होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही तिने पैसे परत केले नाहीत. ही रक्कम बुडवण्यासाठीच तिने हा खोटा गुन्हा दाखल करण्याचा डाव रचला.
साखरपुड्यात कुटुंबाची उपस्थिती, मुलीचा नाशिकमध्ये आनंदी संसार
मुलीच्या विवाहाबाबत वस्तुस्थिती मांडताना पारखे यांनी स्पष्ट केले की, नाशिक येथील मुलाशी विवाह ठरल्यानंतर सोनालीच्या विनंतीवरूनच त्यांच्या घरी कुंकवाचा कार्यक्रम झाला होता. २४ जुलै रोजी झालेल्या साखरपुड्याला खुद्द सोनाली, तिचा दुसरा पती मंगल गुजर, मुलगा व संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. तत्पूर्वी, आई पुन्हा वाद घालेल या भीतीने मुलीने २३ जुलै रोजी स्वतःच्या मर्जीने विवाह केला. सध्या ती नाशिक येथे सासरी सुखाचा संसार करत असून, सण-उत्सव साजरे करतानाचे, रील्स, डान्स व पर्यटनाचे अनेक फोटो व व्हिडिओ पुरावे म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे अपहरणाचा व डांबून ठेवल्याचा दावा पूर्णपणे हास्यास्पद ठरतो, असे त्या म्हणाल्या.
फिर्यादीची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा
फिर्यादी सोनाली गुजर हिची जुनी आर्थिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, मोहाडीतील एका प्रकरणात २०२५ मध्ये न्यायालयाने तिला दोषी ठरवत ८ दिवस कारावास व १ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचा न्यायालयीन निकालही पारखे यांनी यावेळी पुराव्यादाखल सादर केला.
खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची डिजिटल व कायदेशीर पुराव्यांसह तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी, पैसे बुडवण्यासाठी आणि सामाजिक बदनामी करण्यासाठी दाखल झालेला खोटा गुन्हा तातडीने रद्द करावा, दिशाभूल करणाऱ्या संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सौ. अरुणा पारखे यांनी पत्रकार परिषदेत केली.







