२ गावठी कट्टे आणि ५ जिवंत काडतुसांसह ४ जण निष्पन्न
धुळे: शहर आणि परिसरात अवैध शस्त्रांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून, तपासादरम्यान कट रचणारे व मदत करणारे अशा एकूण चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. या कारवाईमुळे शहरातील एक संभाव्य मोठा गुन्हा टळला आहे.

चाळीसगाव रोड चौफुलीवर कारवाई मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी चाळीसगाव रोड चौफुली परिसरात सापळा रचला. तेथून करण दीपक ब्राम्हणे (वय ३१, रा. हेरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याला संशयास्पदरित्या ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना बाळगलेले दोन गावठी कट्टे (पिस्तूल) आणि ५ जिवंत राऊंड आढळले. पोलिसांनी एकूण ८५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाल:
८०,००० रुपये किमतीचे ०२ देशी गावठी कट्टे (मॅग्झीनसह)
५,००० रुपये किमतीचे ०५ जिवंत काडतुसे
एकूण जप्ती: ८५,००० रुपये
याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.नं. २८५/२०२६) करण्यात आला.तपासात पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न उघड प्रारंभिक चौकशीत आरोपी करण ब्राम्हणे याने ही शस्त्रे मध्य प्रदेशातील उमटी येथून खरेदी केल्याचे सांगत कल्याण येथील एका व्यक्तीचे नाव घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी केली असता मूळ कट समोर आला.
करण याने त्याचे साथीदार कृष्णा (पूर्ण नाव अस्पष्ट), सागर अनंता तवले (रा. बालेगाव, जि. ठाणे) आणि स्वप्निल पारधे यांच्या सांगण्यावरून बनावट नाव सांगितल्याचे निष्पन्न झाले. हे सर्व आरोपी एकत्र येऊन या शस्त्रांच्या साहाय्याने गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते.वाढीव कलमे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) फौजदारीपात्र कट रचणे, चिथावणी देणे आणि खोटी माहिती देणे या कलमांखाली वाढीव कारवाई करण्यात आली आहे.
निष्पन्न आरोपींपैकी सागर अनंता तवले याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्याच्यावर ठाणे शहरातील शिवाजीनगर, डायघर आणि हिलाईन पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्र कायदा, गंभीर दुखापत करणे आणि अॅट्रॉसिटी कायदा यांसारखे गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख ज्ञानेश्वर वारे, सपोनि दीपक ढोके, पोउनि अमित माळी, तसेच अंमलदार सदेसिंग चव्हाण, योगेश चव्हाण, संदीप पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र अहिरराव, नरेंद्र गिरासे, आशिष वानखेडे, सुशील शेंडे व विवेक वाघमोडे यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि अमित माळी करत आहेत.








