धुळे / सनी सोनवणे, धुळे :
धुळे शहराजवळील बोरविहिर गावाजवळ टोलनाक्याच्या परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात मोरदड येथील दोन तरुण सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या या अपघातात विनोद शामा बागुल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते सागर शामा बागुल यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड परिसरासह संपूर्ण धुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मोरदड येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते सागर बागुल आणि विनोद बागुल हे दोघे रात्रीच्या वेळी जात असताना बोरविहिर गाव परिसरातील टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा चक्काचूर झाला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे विनोद शामा बागुल यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला.
उपचारादरम्यान सागर बागुलांची प्राणज्योत मालवली
अपघातात गंभीर जखमी झालेले सामाजिक कार्यकर्ते सागर बागुल यांना तातडीने धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी सुमारे साडेसात वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली; डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले..

गावावर शोककळा
सागर बागुल हे परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करत असल्याने तरुणांमध्ये त्यांचा मोठा संपर्क होता. एकाच घरातील दोन तरुण भावंडांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच मोरदड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.







