चाळीसगाव : (नासिर मुल्ला)
तालुक्यातील काकडणे येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका वानराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये चिंता व संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काकडणे गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, कुत्र्यांच्या झुंडीने वानरावर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये वानराचा जागीच मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
गाव व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह इतर मुक्या प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या प्राण्यांमुळे कोणत्याही वेळी गंभीर अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित प्रशासनाने व स्थानिक प्राधिकरणाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, तसेच आवश्यक त्या कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना आखून नागरिकांना व मुक्या जीवांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





