धुळे/साक्री:शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा उर्वरित हप्ता मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागून ती खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून स्वीकारताना साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह शासकीय ठेकेदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी साक्री-धुळे रोडवरील शेवाळी फाट्याजवळ करण्यात आली.
मनमोहन विजयसिंग राजपूत (वय ३० वर्ष, पद – ग्रामीण गृह निर्माण अभियंता, पंचायत समिती साक्री, रा. फ्लॅट नं. १९, पाटील नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) आणि रोहन रोहिदास देवरे (वय ३१ वर्ष, व्यवसाय – शासकीय ठेकेदार, रा. फ्लॅट नं. ३७, गोपाळनगर, साक्री, जि. धुळे) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना मौजे जामदे (ता. साक्री) येथे पंचायत समिती साक्री यांच्याकडून ‘शबरी आवास योजने’अंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. घरकुलाच्या अनुदानाचा काही हप्ता मिळाल्यानंतर त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते. यापूर्वी काही हप्ते अदा करण्याच्या मोबदल्यात अभियंता मनमोहन राजपूत यांनी तक्रारदाराकडून प्रत्येक घरकुलामागे ५ हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपये स्वीकारले होते.
त्यानंतर घरकुलाचा उर्वरित निधी मिळवण्यासाठी तक्रारदाराने १३ ऑगस्ट २०२६ रोजी साक्री पंचायत समिती कार्यालयात जाऊन राजपूत यांची भेट घेतली असता, त्यांनी उर्वरित अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
पडताळणी आणि सापळा कारवाई
प्राप्त तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, अभियंता मनमोहन राजपूत यांनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या घरकुलाचे उर्वरित अनुदान अदा करण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी साक्री-धुळे रस्त्यावरील शेवाळी फाट्याजवळ एसीबीने सापळा रचला. यावेळी राजपूत यांच्या सांगण्यावरून शासकीय ठेकेदार रोहन देवरे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना रंगेहात ताब्यात घेतले.
याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पथक
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक पंडित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, सापळा पथकातील अंमलदार यशवंत बोरसे, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, हितेश चौधरी आणि सुधीर मोरे यांनी केली.








