चाळीसगाव (प्रतिनिधी : नासिर मुल्ला) शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी सुरक्षा, बालगुन्हेगारी आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मेहूनबारे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ यातील फरक समजावून सांगत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच सध्या वेगाने वाढणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले. आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज असलेल्या ‘डायल ११२’ या हेल्पलाइन क्रमांकाच्या वापराबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या अमली पदार्थ विरोधी ‘मिशन RISE’ या विशेष उपक्रमाची माहितीही या वेळी देण्यात आली. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून तरुणाईला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
या जनजागृती कार्यक्रमाला मेहूनबारे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नितीन पाटील यांच्यासह विक्रम पाटील, शांताराम पवार, पोलीस पाटील संदीप निकम, माजी उपसरपंच संजय बिराडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील, प्रशांत साहेबराव चव्हाण, विशाल गायकवाड आणि एस. एम. पाटील यांच्यासह मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





