चाळीसगाव तहसीलदारांना ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’सह समविचारी पक्षांचे निवेदन
चाळीसगाव (नासिर मुल्ला ):देशातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार होणारे पेपर फुटीचे प्रकरण, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थी आणि युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ (शरदचंद्र पवार पक्ष), ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि समविचारी पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे.

सोमवार, २० जुलै रोजी चाळीसगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत पाटील यांना यासंदर्भात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद केलेल्या प्रमुख मागण्या व मुद्दे:
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई न करता सरकार जबाबदारी टाळत आहे. जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी सोनम वांगचूक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. देशात २० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.

दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई: जंतर-मंतरवर घटनात्मक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
आंदोलनाचा इशारा
विद्यार्थी व युवकांच्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास आणि योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या काळात प्रशासनाविरोधात व्यापक व तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), कॉकरोच जनता पार्टी व विविध समविचारी संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रदीप देविदास पाटील (तालुकाध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शेतकरी आघाडी, शरदचंद्र पवार) यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.









