चाळीसगाव (नासिर मुल्ला ):भक्ष्याच्या शोधात आलेली एक बिबट मादी विहिरीत पडल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील सायगाव (आलवाडी शिवार) येथे उघडकीस आली आहे. वन विभागाने दोन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही बिबट्याला वाचवण्यात अपयश आले असून, अखेर वन कर्मचाऱ्यांनी धाडसाने विहिरीत उतरून त्या बिबट मादीचा मृतदेह बाहेर काढला.
नेमकं काय घडलं?

दिनांक १८ जुलै रोजी सायगाव येथील शेतकरी श्री. सलीम मुला यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. विहीर जुनी आणि खोल कपारीची असल्याने बिबट्याला बाहेर येण्यासाठी विहिरीत खाट, लाकडी ओंडका आणि शिडी सोडण्यात आली होती. तसेच मोबाईल आणि लाईव्ह कॅमेऱ्याच्या मदतीने बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात होते. मात्र, सर्व प्रयत्न करूनही बिबट कपारीतून बाहेर आला नाही.

बचावमोहीम आणि शवविच्छेदन
दिनांक १९ जुलै रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता विहिरीत बिबट्याची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुरक्षिततेची उपाययोजना करून विहिरीत उतरून बिबट्याला बाहेर काढले. तपासणीदरम्यान सदर वन्यप्राणी ‘सब-ॲडल्ट’ (अल्पवयीन) मादी बिबट असल्याचे निष्पन्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्या उपस्थितीत नियमानुसार तिचे शवविच्छेदन करण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद धाडस
या मोहिमेत वनपाल श्री.z सागर पाटील, वनरक्षक श्री. ललित पाटील, श्री. अजय महिरे व श्री. रवींद्र पवार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत धाडसाने विहिरीत उतरून मृत बिबट्याला बाहेर काढले. त्यांच्या या तत्परतेचे व समर्पणाचे विशेष कौतुक होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई धुळे विभागाच्या मुख्य वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, जळगावचे उपवनसंरक्षक श्री. राम धोत्रे, सहायक वनसंरक्षक श्री. अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कोमल पिंडकुरवार आणि मानद वन्यजीव रक्षक श्री. राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत चाळीसगाव वनविभागाचे कर्मचारी, मेहुणबारे ग्रामीण पोलीस व सायगावचे पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
वन विभागाचे नागरिकांना आवाहन
”शेतशिवारात किंवा परिसरात कोणताही वन्यप्राणी आढळून आल्यास अथवा अशी आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये. तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.








