धुळे: आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली घरफोडीची मोठी घटना पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या ६ तासांत उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल १ कोटी ५५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
नेमकी घटना काय?
गुजरात येथील सोने व्यापारी अश्विनभाई दुर्लभजीभाई काचलिया (वय ६५) हे व्यवसायानिमित्त धुळ्यात आले होते. त्यांनी १७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान, एका लॉजच्या रूममध्ये १६१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बॅगेत ठेवून खोलीला लॉक केले होते. मात्र, काही वेळाने परत आल्यावर खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे आणि सोन्याची बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांची तत्पर कारवाई
फिर्याद दाखल होताच, आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने तपास पथकाला सूचना दिल्या. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपी हितेश सुरेश सोनी (वय ४२, रा. धुळे) याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला असून, त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल (सोन्याचे विविध प्रकारची दागिने) जप्त करण्यात आला आहे.
पुढील कार्यवाही
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सपोनि विजय ठाकूर व त्यांच्या पथकाने केली आहे.








