धुळे:शिक्षण क्षेत्रात खळबळबळ उडवून देणाऱ्या नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID) प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडीले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) पथकाने धुळ्यातून अटक केली आहे. आज पहाटेच्या सुमारास नाशिक पोलिसांच्या पथकाने धुळे शहरात धडक देत ही कारवाई केली. वाडीले याला आज धुळे न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी नाशिक येथे नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची पहाटेच धडक कारवाई; निवासस्थानाची झाडाझडती सुरू
निवासस्थानाची झाडाझडती सुरू
नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पहाटेच धुळ्यात दाखल झाले होते. प्रशांत वाडीले याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाकडून गेल्या काही तासांपासून त्याच्या निवासस्थानाची कसून झाडाझडती (सर्च ऑपरेशन) घेतली जात आहे. या शोधमोहिमेत बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे किंवा डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
संशयित आरोपी प्रशांत वाडीले याची नुकतीच ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिक्षक आघाडी’च्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला काही दिवस उलटत नाही तोच थेट आर्थिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्याने धुळे आणि नाशिकच्या राजकीय व शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता
नाशिकमधील कोट्यवधी रुपयांच्या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात आहे. आता या प्रकरणातील मुख्य संशयित प्रशांत वाडीले हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे, त्याच्या चौकशीतून या रॅकेटमधील आणखी कोणकोणते चेहरे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








