इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून ‘१ लाखाचे ७ लाख’ करण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड; धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई
धुळे:‘१ लाख रुपयांचे ७ लाख आणि २ लाख रुपयांचे १५ लाख रुपये मिळतील’ अशा आकर्षक आणि दिशाभूल करणाऱ्या रिल्स इन्स्टाग्राम व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करून, लोकांना आर्थिक लालसेपोटी जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका मुख्य संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील ९५ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर अन् निर्जन स्थळी लूट
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अजनाळे आणि हेंकळवाडी गाव परिसरातील काही तरुणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर सुरू केला होता. त्यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर ‘इंडियन सेकंड करन्सी मिलेगी’, ‘१ लाख का ७ लाख’ अशा वेगवेगळ्या शीर्षकांचे रिल्स अपलोड केले होते. या रिल्सच्या आमिषाला बळी पडून संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना आरोपी हे पैसे दाखविण्याच्या बहाण्याने अजनाळे आणि हेंकळवाडी गावाजवळील निर्जन स्थळी बोलवून घेत असत.
त्यानंतर, तिथे आलेल्या पीडित व्यक्तींना आणि साक्षीदारांना शस्त्राचा (हत्याराचा) धाक दाखवून, शिवीगाळ व जबर मारहाण केली जात असे. तसेच त्यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल फोन जबरदस्तीने लुटून घेतले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या भीतीपोटी अनेक पीडित नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते, त्यामुळे या टोळीचे धाडस अधिकच वाढले होते.
अशी झाली अटक
दिनांक १० जून २०२६ रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात या फसवणूक व जबरी चोरीप्रकरणी गु.र.नं. ३५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३०९(४), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय मुंडे (पाटील) व त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनील उर्फ अविनाश शंकर भोसले (वय ४५ वर्षे, मूळ रा. ककमडी, ता. आनणी, जि. बेळगाव; सध्या रा. पारधीवस्ती, अजनाळे, ता. जि. धुळे) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील ९५,००० रुपये रोख हस्तगत केले आहेत.
या पोलीस पथकाची उत्कृष्ट कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनिरी. धनंजय पाटील, पोउनि. कैलास माळी, पोउनि. प्रशांत राठोड, तसेच पोलीस अंमलदार रवींद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, महेंद्रसिंग गिरासे, भावेश झिरे आणि सुरेंद्र खांडेकर यांच्या पथकाने अत्यंत चातुर्याने यशस्वी केली.
पोलिसांचे आवाहन:
सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या कोणत्याही अवास्तव आर्थिक आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये. जर कोणाची अशा प्रकारे फसवणूक किंवा लूट झाली असेल, तर त्यांनी न घाबरता तातडीने धुळे तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







