धुळ्यातील ‘श्री लाडशाखीय वाणी समाज संस्थेची’ कोट्यवधींची इमारत पुन्हा समाजाच्या ताब्यात
धुळे:शहरातील मध्यवर्ती भागात असलेली श्री लाडशाखीय वाणी समाज संस्थेची कोट्यवधी रुपयांची भव्य इमारत तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर संघर्षानंतर पुन्हा अधिकृत विश्वस्तांच्या ताब्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गैरअर्जदारांचा अर्ज फेटाळल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार ही मालमत्ता कायदेशीररीत्या पुन्हा संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. या ऐतिहासिक विजयामुळे धुळे जिल्ह्यातील वाणी समाजात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
गल्ली नं. ४ मधील सिटी सर्व्हे नं. १३१९ ही संस्थेची ३ मजली इमारत १९७२ पासून संस्थेच्या मालकीची होती. मात्र, २००१ मध्ये तत्कालीन काही पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता, केवळ २ लाख रुपयांच्या बनावट सौदापावतीद्वारे ही कोट्यवधींची मालमत्ता अरुण शिनकर आणि सविता शिनकर यांच्या नावावर करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला होता.

असा रंगला २५ वर्षांचा संघर्ष
या फसवणुकीविरुद्ध समाजातील जागरूक नागरिक आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक दादा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक समाजबांधवांनी कायदेशीर लढा सुरू केला. २००३ मध्ये नाशिक येथील सह धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये अशोक पाटकर यांनी स्वतः १ कोटी रुपये देऊन इमारत राखण्याची तयारी दर्शवत ५० लाखांची बँक गॅरंटीही न्यायालयात सादर केली होती.
न्यायालयीन प्रक्रियेतील टप्पे:
२००७: धर्मादाय आयुक्तांनी शिनकर यांचा खरेदी अर्ज फेटाळून संस्थेचा ताबा देण्याचे आदेश दिले.
२०१०-११: गैरव्यवहाराप्रकरणी दोषी विश्वस्तांना बडतर्फ करण्यात आले.
२०१४: संस्थेवर नवीन अधिकृत विश्वस्तांची नियुक्ती झाली.
२०२५-२६: मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयानेही (SLP No. १८४४९/२०२६) २५ मे २०२६ रोजी गैरअर्जदारांची याचिका थेट फेटाळून (Dismiss) संस्थेच्या बाजूने निकाल दिला.
पोलिसांच्या उपस्थितीत ताबा
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष राजाराम श्रावण वाणी (बालुआबा), अशोक दादा पाटकर, विश्वस्त आणि संचालकांनी या मालमत्तेचा कायदेशीर ताबा घेतला. तसेच, गैरअर्जदारांचे २ लाख रुपये रजिस्ट्रर पोस्टाने परत करत संस्थेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
समाजबांधवांकडून जल्लोष
या विजयामुळे वाणी समाजात उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येत आहे. “हा केवळ संस्थेचा विजय नसून संपूर्ण समाजाच्या एकजुटीचा विजय आहे,” अशी भावना व्यक्त करत समाजबांधवांनी या लढ्यातील सर्व पदाधिकारी व कायदेतज्ज्ञांचे कौतुक केले आहे. या मालमत्तेचा उपयोग आता पुन्हा समाजोपयोगी कार्यासाठी केला जाणार असल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.







