आजपासून क्युमाईन क्लबसमोर बेमुदत धरणे आंदोलन!
धुळे: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात, जमनागिरी रोडवरील धान्य गोदामाजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत आज, १८ मे २०२६ पासून धुळ्यात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर आंदोलकांनी हा पवित्रा घेतला असून, या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

३० कोटींहून अधिकचा निधी धोक्यात?
महाराष्ट्र शासनाने धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी आणि विकासासाठी तब्बल ३० कोटी ७९ लाख ६८ हजार ३९७ रुपयांचा निधी मंजूर करून या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे आदेश १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिले होते. मात्र, तांत्रिक मंजुरी आदेशातील अंदाजपत्रकीय तरतुदींना केराची टोपली दाखवत, संबंधित कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे.
जुन्या विटांचे तुकडे आणि सिमेंटचा ढिगारा पायात!
आंदोलकांनी अर्जात दिलेल्या माहितीनुसार, या भव्य इमारतीचा पाया (फाउंडेशन) मजबूत करण्यासाठी दर्जेदार साहित्याचा वापर करणे बंधनकारक असताना, तिथे जुन्या विटांचे तुकडे आणि पूर्वी पाडलेल्या शासकीय घरांचा सिमेंटचा मलबार (कचरा) टाकला जात आहे. इमारतीचा पायाच ठिसूळ व कमकुवत होत असल्याने भविष्यात या शासकीय इमारतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
दोंडाईचात ‘उत्कृष्ट’ तर धुळ्यात ‘निकृष्ट’ का?
आंदोलकांनी पत्रात सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोंडाईचा येथील विश्रामगृहाच्या (रेस्ट हाऊस) कामाचा दाखला दिला आहे. दोंडाईचा येथील शासकीय इमारतीच्या पायामध्ये उत्कृष्ट प्रतीचा मुरुम टाकून, योग्य प्रमाणात पाणी मारून दर्जेदार काम करण्यात आले. मग तोच नियम धुळ्यातील जमनागिरी रोडवरील इमारतीला का लावला गेला नाही? कार्यकारी अभियंता व इतर जबाबदार अधिकाऱ्यांच्या कथित ‘देवाण-घेवाण’ आणि गैरव्यवहारामुळेच कंत्राटदाराला पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
‘क्युमाईन क्लब’ समोर आंदोलनाचे हत्यार
या निकृष्ट कामाचे पुरावे आणि फोटोसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (सा.बां.) वेळोवेळी लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची साधी चौकशीही केली नाही. अखेर नाईलाजास्तव अॅड. ऋतुराज दिगंबर वाघ (जिल्हाध्यक्ष, लिगल सेल-आझाद समाज पार्टी व अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद), पत्रकार प्रमोद आनंदा झालटे आणि माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ जितुभाऊ शिरसाठ यांनी आजपासून जेल रोडवरील ‘क्युमाईन क्लब’ समोर सकाळी १० ते ५ या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
प्रशासनाला इशारा
हे आंदोलन पूर्णपणे कायदेशीर व संवैधानिक मार्गाने होत असून, यादरम्यान कोणतीही अप्रिय किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांची राहील, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, धुळे शहर पोलीस स्टेशन आणि सा.बां. मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.
आता या कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की प्रशासन याकडे डोळेझाक करणार, याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.








