ऊस गल्लीत अवजड वाहनांची उघड घुसखोरी; प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहतंय का?
धुळे: शहराच्या मुख्य बाजारपेठ आणि रहिवासी भागांमध्ये अवजड वाहनांना बंदी (नो एन्ट्री) घालण्यात आलेली असतानाही, शहरातील गल्ली नंबर ४, गल्ली नंबर ५ आणि ऊस गल्ली या अत्यंत गजबजलेल्या भागात काही व्यावसायिक सर्रासपणे मोठी आणि अवजड वाहने घुसवून नियमांची पायमल्ली करत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या वाहनांसाठी ठरावीक वेळ (टाईम टेबल) आखून दिला असला, तरी या वेळेचे कोणतेही पालन होताना दिसत नाही. या भागात एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

नियमांना केराची टोपली; नागरिकांचा जीव टांगणीला
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’ लागू केली आहे. व्यावसायिकांची अडचण होऊ नये म्हणून रात्रीची किंवा विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीचा गैरफायदा घेत काही व्यावसायिक दिवसाढवळ्या, भर बाजाराच्या आणि गर्दीच्या वेळीच ही मोठी वाहने थेट गल्ल्यांमध्ये आणत आहेत.
अरुंद रस्ते आणि त्यात ही अवाढव्य वाहने यामुळे या परिसरात तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या बेशिस्त वाहतुकीमुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे.

लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “घराबाहेर पडणे सुद्धा आता अत्यंत धोक्याचे झाले आहे. गल्लीत खेळणारी लहान बालके, बाजारात जाणाऱ्या महिला आणि वृद्ध नागरिक यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या अवजड वाहनांचा धक्का लागून जर उद्या एखादा अनुचित प्रकार घडला, किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन की जिल्हाधिकारी घेणार?”
प्रशासन ढिम्म; नागरिकांचा आक्रोश
वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. व्यावसायिक आणि वाहन चालकांवर प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. अनुचित प्रकार घडण्याआधीच प्रशासनाने कठोर पावले उचलून या भागातील अवजड वाहनांची बेकायदेशीर घुसखोरी तात्काळ थांबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जात आहे.









