धुळे (प्रतिनिधी): शहरात नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या साक्री रोड परिसरातील ‘सेवा हॉस्पिटल’ मध्ये आज पुन्हा एकदा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप करत नातेवािकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विटाभट्टी परिसरातील रहिवासी दत्तात्रय खंडेकर यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज, २८ एप्रिल रोजी त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया (Surgery) केली जात होती. मात्र, ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात कमालीचा हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप खंडेकर यांच्या नातेवािकांनी केला आहे.

नातेवािकांचा आक्रोश आणि जुन्या जखमा ताज्या
घटनेची माहिती मिळताच खंडेकर यांच्या नातेवािकांनी आणि मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. यावेळी रुग्णालयाबाहेर नातेवािकांचा हृदयद्रावक आक्रोश पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबातील ही दुसरी घटना असल्याचे नातेवािकांकडून सांगण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संताप अधिकच अनावर झाला होता.
पोलीस घटनास्थळी दाखल
रुग्णालयातील तणावपूर्ण परिस्थितीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ सेवा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. संतप्त जमावाला शांत करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
“या घटनेमुळे साक्री रोड परिसरातील वैद्यकीय सेवा आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवािकांनी केली आहे.”









