तीन आरोपींना रंगेहात पकडले; राज्य दक्षता पथकाची मोठी कारवाई
धुळे :अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने दोन दिवस गुप्त पाळत ठेवून गुजरात-धुळे महामार्गावर अवैधरीत्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर, एचपी कंपनीचा डिझेल टँकर, १४० व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि अन्य साहित्यासह सुमारे १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

ढाब्यांच्या मागे सुरू होता काळाबाजार
ही कारवाई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ, सुरत-धुळे महामार्गावरील ‘अन्नपूर्णा ढाबा’ आणि ‘पार्श्वनाथ ढाबा’ यांच्या परिसरात करण्यात आली. या ढाब्यांच्या मागे टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोन दिवस परिसरात पाळत ठेवून गॅस आणि डिझेलची चोरी सुरू असतानाच अचानक छापा टाकला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
कारवाईदरम्यान पथकाने खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
एलपीजी गॅस टँकर (GJ-06 AZ-4430): गुजरातहून जळगावकडे जाणारा टँकर आणि त्यातील १७.४२ मेट्रिक टन एलपीजी गॅस.
डिझेल टँकर (GJ-12 BZ-7999): टँकरसह त्यातील ३५ किलोलीटर डिझेल.
वाहने: एक बोलेरो पिकअप आणि एक छोटा ट्रक.
इतर साहित्य: १३० व्यावसायिक गॅस सिलिंडर (एकूण १४० सिलिंडर), गॅस भरण्याचे नॉझल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि ड्रममध्ये साठवून ठेवलेले डिझेल.

दक्षता पथकाची धडक कामगिरी
अवैध इंधन व गॅस चोरीविरोधातील ही अलीकडील काळातील अत्यंत मोठी आणि यशस्वी कारवाई मानली जात आहे.
ही धडक कारवाई राज्य दक्षता पथकातील अधिकारी दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे अवैध इंधन माफियांचे धाबे दणाणले आहेत.








