शहर प्रतिनिधी | धुळे
शहरातील कमलाबाई शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याच्या कारणावरून महानगरपालिकेने धडक कारवाई करत अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कारवाईचा मोठा फटका एका अंध पती-पत्नीला बसला असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली स्टेशनरी आणि किराणा मालाची टपरी पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने जोरात उचलून नेली. या निर्दयी कारवाईत टपरीतील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, या अंध दाम्पत्याचा संसाराचा गाडाच उद्ध्वस्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई शाळेच्या परिसरात हे अंध दाम्पत्य एक छोटीशी टपरी चालवत होते. या टपरीत स्टेशनरी आणि काही किराणा माल विकून ते अत्यंत प्रामाणिकपणे आपले कुटुंब चालवत होते. शारीरिक व्यंग असूनही कोणासमोर हात न पसरता ते स्वाभिमानाने जगत होते. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने पालिकेने परिसरातील अतिक्रमणे व अडथळे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत पालिकेच्या पथकाने अचानक कारवाई करत या अंध दाम्पत्याची टपरी हटवली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी साचण्याच्या समस्येवर कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांनी कोणतीही माणुसकी किंवा परिस्थितीचे भान ठेवले नाही. जेसीबीच्या साहाय्याने टपरी अत्यंत वेगाने आणि जोरात उचलण्यात आल्याने आतील सर्व किराणा व स्टेशनरी साहित्याची मोठी नासधूस झाली. डोळ्यांना दिसत नसल्याने हे हतबल दाम्पत्य आपला मालही वाचवू शकले नाही. या कारवाईत त्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नागरिकांमधून तीव्र संताप
पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढणे प्रशासनाचे काम असले तरी, पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या दोन अंध व्यक्तींच्या टपरीवर कोणतीही पूर्वसूचना न देता अशी कठोर कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नुकसान भरपाईची व पुनर्वसनाची मागणी
पालिकेने कारवाई केली असली तरी, या अंध दाम्पत्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या नुकसानीची तातडीने आर्थिक भरपाई द्यावी आणि त्यांना सन्मानाने आपला व्यवसाय करण्यासाठी पाणी न साचणाऱ्या ठिकाणी योग्य ती पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.









