धुळे (सनी सोनवणे ):
धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. मुकटी गावात पुरात अडकलेल्या दोन मुलांना, तसेच अमोडे गावात दोन नंदींना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सविस्तर माहितीनुसार, आज सकाळी ११:३३ वाजता पोलीस नियंत्रण कक्षातून धुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला एक तातडीचा फोन आला. मुकटी गावात पुराच्या पाण्यामुळे चार मुले एका झाडावर अडकल्याची धडकी भरवणारी माहिती यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाने त्वरित मंत्रालयात संपर्क साधून मदत मागितली. यानंतर तात्काळ बचाव पथक (HDRF) घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर चारपैकी दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
अमोडे गावात नंदींची सुटका
दुसरीकडे, अमोडे गावातील एका मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने तिथे चार नंदी अडकले होते. बचाव पथकाने त्वरित धाव घेत यातील दोन नंदींना सुरक्षितपणे बाहेर काढले.
‘आपदा मित्र’ सज्ज
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातही अनेक ठिकाणी विहिरी भरून वाहू लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी व तातडीच्या मदतीसाठी शहरातील लहान पुलाजवळ ‘आपदा मित्र’ (आपत्ती प्रतिसाद स्वयंसेवक) पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
जिल्ह्यातील सद्यस्थिती आणि पुराचा वाढता जोर पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत बचावकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रशासनाने सर्व यंत्रणांना ‘अलर्ट मोड’वर राहण्याचे आदेश दिले असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि नदीकाठी किंवा धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.








