१० लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना अधिकारी रंगेहात जाळ्यात
धुळे : (सनी सोनवणे)
धुळे येथील समाज कल्याण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी धडक कारवाई करत एका वर्ग-२ च्या अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विशाल चौधरी असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील शासकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने समाज कल्याण विभागांतर्गत एक काम केले होते, ज्याचे सुमारे १० लाख रुपयांचे बिल थकीत होते. हे शासकीय बिल मंजूर करून त्याचे पैसे अदा करण्यासाठी समाज कल्याण विभागातील वर्ग-२ चे अधिकारी विशाल चौधरी यांनी तक्रारदाराकडे बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोड पडली महागात
स्वतःच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) कार्यालय गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची गोपनीय पद्धतीने शहानिशा केली. दरम्यान, अधिकारी विशाल चौधरी आणि तक्रारदार यांच्यात लाचेच्या रकमेवरून तडजोड झाली व ३० हजार रुपयांवरून ही बोली २५ हजार रुपयांवर आली. अखेर ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारण्याचे अधिकाऱ्याने मान्य केले.
असा यशस्वी झाला एसीबीचा सापळा
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धुळे येथील समाज कल्याण कार्यालयात अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने अधिकारी विशाल चौधरी यांना रंगेहात पकडले.
पुढील तपास सुरू
एसीबीने अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीचे पथक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.









