2020 मध्ये शिरपूर येथे सापडला होता चार हजार किलो गांजा
धुळे:शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात २०२० मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ३९०४ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या बहुचर्चित अमली पदार्थ (NDPS) प्रकरणातील आरोपी मांगीलाल बारकू पावरा याची तपासातील त्रुटी आणि साक्षीदारांच्या विसंगतीमुळे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बचाव पक्षाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे तब्बल ५८ न्यायनिवाडे सादर करत तपासातील उणिवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
अशी झाली होती कारवाई:
१६ जून २०२० रोजी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावात मांगीलाल पावरा याने शेतात बांधकामाधीन घराच्या बाजूला चाऱ्याच्या पेंढ्याखाली गांजा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तत्कालीन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या उपस्थितीत पथकाने दुपारी ३:२० च्या सुमारास छापा टाकला.

पोलिसांना पाहून आरोपी मांगीलाल पावरा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी शेताची झडती घेतली असता, प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला ३९०४ किलो वजनाचा अर्धवट सुकलेला गांजा (एकूण १२८ गोण्या, प्रत्येकी ३०.५०० किलो) जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी सपोनि उमेश बोरसे यांनी जप्ती पंचनामा केला होता, तर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अभिषेक पाटील व पोनि सुरेश शिरसाठ यांनी केला होता.
न्यायालयातील कामकाज आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद:
या खटल्याच्या कामकाजादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जप्ती पंच, फिर्यादी, छापा पथकातील पोलीस कर्मचारी, वजनकाटाधारक, अटक पंच, फोटोग्राफर आणि तपास अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, बचाव पक्षातर्फे करण्यात आलेली उलटतपासणी आणि युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला.
बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की:
साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती आणि त्रुटी आहेत.
पंचनामा तयार करताना बोलावण्यात आलेले पंच हे स्वतंत्र नागरिक नसून ते पोलीस अधीक्षक कार्यालयातीलच कर्मचारी होते.
एनडीपीएस (NDPS Act 1985) कायद्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि अनिवार्य तरतुदींचे तपासादरम्यान पालन करण्यात आलेले नाही.
प्रत्यक्ष छापा मारताना तत्कालीन पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि एलसीबीचे निरीक्षक हजर होते (ज्याचे फोटो दोषारोपपत्रात आहेत), मात्र त्यांच्या सह्या जप्ती पंचनाम्यावर नाहीत. तसेच, इतक्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना गुन्ह्याकामी साक्षीदार म्हणून तपासण्यातच आले नाही.
५८ न्यायनिवाड्यांचा संदर्भ:
तपासातील या गंभीर त्रुटींवर बोट ठेवत बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांचे तब्बल ५८ न्यायनिवाडे (Judgments) न्यायालयात सादर केले. न्यायालयाने बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि कायदेशीर मुद्दे ग्राह्य धरून आरोपी मांगीलाल बारकू पावरा याची ३९०४ किलो गांजा बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
या महत्त्वपूर्ण खटल्यात आरोपीतर्फे प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मोहन एस. भंडारी यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. चैतन्य एम. भंडारी, ॲड. चार्मिश एम. भंडारी, ॲड. प्राजक्ता राणा, ॲड. पूजा प्रजापत आणि ॲड. प्रशांत वाघ यांनी कायदेशीर साहाय्य केले.








