धुळे: महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार धुळे ग्रामीण तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर अभियान टप्पा क्रमांक-१’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आता थेट त्यांच्या गावातच सुटणार आहेत.
पत्रकार परिषदेत तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली माहिती
या अभियानाचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माहिती दिली की, प्रशासनाला अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.
”जनसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेने महसूल अधिकारी व कर्मचारी थेट ग्रामस्तरावर उतरून काम करत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी या मोहिमेचा प्रचार अहिराणी व मराठी भाषेतून केला जात असून, सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कामांचा आणि योजनांचा मिळणार थेट लाभ
या शिबिराच्या माध्यमातून खालील महत्त्वाचे प्रश्न आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जात आहे:
महसूल नोंदी: प्रलंबित वारस नोंदींचे कायदेशीर पुरावे तपासून तात्काळ निपटारा करणे आणि अद्ययावत ७/१२ चे वाटप करणे.
जमीन विषयक: भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याची प्रलंबित प्रकरणे पूर्ण करणे.
कल्याणकारी योजना: आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची E-KYC सुविधा शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय: शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘कॅम्प मोड’वर विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे.
तांत्रिक मार्गदर्शन: ई-मोजणी, पीक विमा, पीएम किसान योजना आणि ‘एक जिल्हा एक नोंदणी’ बाबत विशेष मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
धुळे ग्रामीणमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे सर्वसामान्य जनतेची शासकीय कार्यालयातील पायपीट थांबणार असून कामात पारदर्शकता येणार आहे.



