धुळे: बिहारमधील गया येथील जागतिक वारसा असलेले ‘महाबोधी बुद्ध विहार’ हे पूर्णतः बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉ. चंद्रबोधी पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. के. के. बच्छाव आणि आयु. शंकरराव ढेगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या आणि निवेदनांतील मुद्दे:
निवेदनात म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या भूमीत ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्यांनी जगाला ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असा शांततेचा संदेश दिला, ते महाबोधी महाविहार सध्या काही विशिष्ट व्यक्ती आणि सरकारांच्या नियंत्रणाखाली आहे. हे विहार तत्काळ बौद्ध समाजाच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पूर्णतः स्वाधीन करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

नेतृत्व आणि उपस्थिती:
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश (आण्णा) लोंढे आणि धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र (आण्णा) महाले यांनी केले. या आंदोलनात राजेश ओव्हाळ उपस्थिती होती. त्यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी या आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रशासनाला इशारा:
“महाबोधी विहार हा जागतिक बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेचा विषय आहे. जगाला शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन बौद्धांकडे असणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जर प्रशासनाने आणि संबंधित सरकारने या मागणीची दखल घेतली नाही, तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.








