धुळे: राज्यातील ‘लिंगपिसाट’ आणि ‘भोंदू बाबा’ प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले असून, शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर बोचरी टीका केली आहे. “केवळ सरकारला पाठिंबा देणाऱ्यांना अभय द्यायचे आणि इतरांना टार्गेट करायचे, हा कसला न्याय?” असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचा दुष्काळ?
अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर टीका करताना म्हटले की, पहाटे कोंबडा आरवतो तशा रोज नवनवीन घोषणा मुख्यमंत्री करतात. मात्र, या घोषणांची अंमलबजावणी कधी होणार? असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. “नुसत्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करू नका, प्रत्यक्ष कृती करून दाखवा,” असे आवाहन त्यांनी केले.

‘त्या’ भोंदू बाबावर मोक्का लावा!
लिंगपिसाट भोंदू बाबा प्रकरणाचा संदर्भ देत गोटे म्हणाले की, अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान असता कामा नये. संबंधित भोंदू बाबावर तात्काळ ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी. तसेच, ज्यांनी या लिंगपिसाटगिरीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खतपाणी घातले, त्यांना सरकार कधी बेड्या ठोकणार? की सत्ताधारी पक्षाचे कवच असल्याने त्यांना सोडून दिले जाणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
राजकीय ब्लॅकमेलींगचा संशय
या संपूर्ण प्रकरणाच्या आड सध्या राजकीय ब्लॅकमेलींग सुरू आहे का? अशी शंकाही अनिल गोटे यांनी उपस्थित केली आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
बीड आणि धुळे प्रकरणावरून भाजपला घेरले
बीड संतोष देशमुख प्रकरण: “बीडच्या संतोष देशमुख प्रकरणात भाजपचे नेते ‘एकालाही सोडणार नाही’ अशा वल्गना करत होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित लोक आजही बाहेर मोकाट फिरत आहेत,” असा आरोप गोटे यांनी केला.
धुळे ‘गुलमोहर’ प्रकरण: धुळ्यातील गुलमोहर बंगल्यावर करोडो रुपये सापडल्याचे प्रकरण सर्वांना माहित आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासकीय सुस्तपणावर बोट ठेवले.
सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना वाचवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचा वापर केला जात असल्याचा दावा करत, गोटे यांनी आगामी काळात याविरोधात आवाज उठवण्याचा इशारा दिला आहे.








