पुणे: पुणे शहर पोलिसांनी अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथक-२ ने विमाननगर येथील ‘अॅटलान्टिस’ रूफ टॉप लाउंजवर छापा टाकला. या ठिकाणी विनापरवाना हुक्का पार्लर आणि विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई
दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे शाखेचे पथक परिमंडळ ४ च्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, विमाननगरमधील रॉयल टॉवर येथील ‘अॅटलान्टिस’ रूफ टॉप लाउंजमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाड टाकली.

सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या कारवाईत पोलिसांनी खालील सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे:
१. स्वप्निल शांताराम तांबे (वय ३२, वाघोली)
२. अमेय मुकेश अजमीरे (वय २८, वाघोली)
३. नवरंग विठ्ठलराव कोल्हे (वय २८, विमाननगर)
४. अमितकुमार दयालजी गोयल (वय २६, खराडी)
५. कमरूल इस्लाम लष्कर (वय २६, खराडी)
६. शिवमकुमार श्रीरामराज यादव (वय २३)
७. माहरुफ अफताफउद्दीन आलम (वय १८)
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी हॉटेलमधून हुक्का पॉट, विदेशी दारूच्या बाटल्या, तंबाखूजन्य पदार्थ आणि रोख रक्कम असा एकूण १,४७,५५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कायदेशीर कारवाई
आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये ‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८’ चे कलम ४(अ), २१(अ) आणि ‘महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम’ कलम ६५(अ)(ई) नुसार गुन्हा (गु.र.नं. २००/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक:
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखील पिंगळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक निरीक्षक नितीन नाईक व कर्मचारी शेख, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, कळसकर, बास्टेवाड आणि महिला अंमलदार माकडी यांनी यशस्वी केली.









