महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक भयभीत; महिनाभरात ७२ जणांना चावा
धुळे:शहरातील बारा पत्थर परिसरात एका भटक्या कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका तरुण कामगाराला आपला अर्धा कान गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटाबाबत महापालिका प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन शाह (वय ३१, रा. ८० फुटी रोड) हे तरुण आपल्या कामावर जात असताना बारा पत्थर रोडवर ही घटना घडली. रस्त्यावरून चालत असताना एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की, कुत्र्याने मोहसीन यांच्या कानाचा लचका तोडून तो खाल्ला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहसीन यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले.

प्रशासनाचे अपयश आणि आकडेवारी
धुळे महानगरपालिकेकडून ‘श्वान निर्बीजीकरण’ मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी वास्तवात चित्र वेगळेच आहे. प्राप्त माहितीनुसार:गेल्या अवघ्या एका महिन्यात तब्बल ७२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिका दवाखान्यात झाली आहे.शहरातील गल्लीबोळांत आणि मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांची टोळी दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
नागरिकांचा संताप
“एकीकडे निर्बीजीकरणाचा खर्च दाखवला जातोय आणि दुसरीकडे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
मोहसीन शाह यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, या घटनेनंतर आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.









