धुळे : येथील धुळे खुले जिल्हा कारागृहातील एक कैदी गुरुवारी दुपारी कारागृहाच्या शेती विभागातून सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भिकन नजीर पिंजारी (शिक्षा बंदी क्रमांक ५८) असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव असून, याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
भिकन पिंजारी हा मागील दोन वर्षांपासून धुळे कारागृहाच्या शेती विभागात नियमितपणे काम करत होता. नेहमीप्रमाणे ५ मार्च २०२६ रोजी सकाळी त्याला अन्य कैद्यांसह कारागृहाच्या मालकीच्या शेतीवर कामासाठी बाहेर काढण्यात आले होते. दुपारी ३:३० ते ३:४५ वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, भिकन पिंजारी त्या ठिकाणी नाही.
शोध मोहीम आणि गुन्हा दाखल
कैदी बेपत्ता असल्याचे समजताच कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात तातडीने शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर या बंदीच्या पलायनाबाबत स्थानिक धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या सर्वत्र त्याचा शोध घेत आहेत.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
कारागृहाचा शेती विभाग हा शहराच्या मुख्य वर्दळीच्या परिसरात असून जवळच मुख्य रस्ता आणि बस स्टँड आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत कैद्याने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते. या घटनेनंतर संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातील कसूरीबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक बी. व्ही. साबळे यांनी दिली आहे.








