धुळे: मनमाड-इंदौर आणि बोरविहीर-नरडाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात माझ्या कोणत्याही नातेवाईकाची जमीन गेलेली नाही आणि कोणालाही मोबदला मिळालेला नाही. माजी आमदार अनिल गोटे यांनी अर्धवट माहितीच्या आधारे केलेले आरोप धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे चोख प्रत्युत्तर आमदार कुणाल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.
‘त्या’ आरोपात तथ्य नाही
अनिल गोटे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन रेल्वे मार्गातील भूसंपादनाच्या मोबदल्यात भेदभाव झाल्याचा आरोप केला होता. यावर स्पष्टीकरण देताना आ. कुणाल पाटील म्हणाले की, “या रेल्वे प्रकल्पात माझ्या कोणत्याही नातेवाईकाची जमीन बाधित झालेली नाही. त्यामुळे मोबदला मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गोटे यांनी कोणतेही आरोप करण्यापूर्वी माहितीची शहानिशा करून घ्यावी.”

शेतकर्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना आ. पाटील म्हणाले की सभागृहात आवाज: २७ जुलै २०२३ रोजी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली होती.
प्रशासकीय पाठपुरावा: तत्कालिन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी सातत्याने तगादा लावला आहे.
संघर्षाची भूमिका: जोपर्यंत प्रत्येक प्रकल्पबाधित शेतकऱ्याला समाधानकारक आणि जास्तीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत माझा लढा थांबणार नाही.
“शेतजमीन हा शेतकऱ्याच्या हृदयाचा तुकडा असतो. ती प्रकल्पासाठी देताना होणाऱ्या वेदनांची आम्हाला जाणीव आहे. जनतेची सेवा हाच आमचा वारसा असून, राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल.”
— आमदार कुणाल पाटील








