धुळे:धुळे जिल्हा खुले कारागृहातून शेतीकाम करत असताना रखवालीतून पळून गेलेल्या एका सराईत शिक्षाबंदीला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून शिताफीने अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भिकन नजीर पिंजारी (वय ५४, रा. इस्लामपूर, पिंपळगाव ब., ता. निफाड) हा धुळे जिल्हा खुले कारागृहात शिक्षा भोगत होता. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास, कारागृहाच्या शेती विभागातील ‘बावडीबाग’ येथे काम करत असताना तो कायदेशीर रखवालीतून पळून गेला होता. याप्रकरणी कारागृह शिपाई अरुण एकनाथ केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८६/२०२६, भा.न्या. संहीता कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्रे फिरली
घटनेचे गांभीर्य ओळखून धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यांनी तपास अधिकारी पोउपनि मिलिंद नवगिरे यांना फरार आरोपीच्या कारागृहातील रेकॉर्डवरून मोबाईल क्रमांक मिळवून शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपीचा मोबाईल क्रमांक (७७९६९९५६४५) हा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात सक्रीय असल्याचे दिसून आले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक नाशिककडे रवाना केले.
अशी झाली अटक
तपास पथकाने टॉवर लोकेशनचा मागोवा घेत ६ मार्च २०२६ रोजी रात्री २३:३० वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथून भिकन पिंजारी याला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला जेरबंद करून धुळे शहर पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मार्गदर्शन व पथक:
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. दिपक पाटील, पोउपनि मिलिंद नवगिरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.








