चिमुरड्याच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
धुळे | शहरातील जो.रा. सिटी हायस्कूल परिसरातून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा धाडसी प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संग्राम विक्रम पात्रे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने केलेल्या आरडाओरडामुळे अपहरणकर्त्यांनी त्याला मोगलाई परिसरात सोडून पळ काढला. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम पात्रे हा जो.रा. सिटी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. शाळेच्या वेळेत तो लघुशंकेसाठी गेला असताना, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी त्याला गाठले. काही समजण्याच्या आतच या व्यक्तींनी संग्रामला जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
मोगलाई परिसरातून सुटका
अपहरणकर्ते संग्रामला ओढत मोगलाई परिसरापर्यंत घेऊन गेले. मात्र, संग्रामने घाबरून न जाता हिंमत दाखवत मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पकडले जाण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी संग्रामला तिथेच सोडून पळ काढला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत संग्रामने पुन्हा शाळेची वाट धरली.
शिक्षकांचे प्रसंगावधान आणि पालकांची धाव
संग्राम जेव्हा शाळेत परतला, तेव्हा त्याची घाबरलेली अवस्था पाहून शिक्षकांना संशय आला. शिक्षकांनी तात्काळ त्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि “संग्रामला न्यायला कोणी नातेवाईक आले होते का?” अशी विचारणा केली. पालकांनी नकार दिल्यानंतर संग्रामने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलाच्या तोंडून हा थरार ऐकून पालकांनी तातडीने शाळा गाठली आणि त्यानंतर शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून तपास सुरू:
शहर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून परिसरातील आणि मोगलाई भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









