धुळे:
जगातील युद्धाजन्य परिस्थितीमुळे गॅस आणि इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, शासनाने कमर्शियल गॅस सिलिंडरच्या वाटपावर निर्बंध घातले आहेत. मात्र, लग्नसराईचा मुख्य हंगाम सुरू असतानाच घेतलेल्या या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील मंगल कार्यालय आणि लॉन्स चालकांचे धाबे दणाणले आहेत. सिलिंडरअभावी व्यवसाय बंद पडण्याची भीती निर्माण झाली असून, चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत मदतीची मागणी केली आहे.
हंगामाच्या तोंडावर ‘उपासमारीची’ भीती
धुळे जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय व लॉन्सच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्षभरातील लग्नसराईचे हे दोन-तीन महिनेच त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतात. वर्षभराचा उदरनिर्वाह याच हंगामावर अवलंबून असतो. मात्र, याच काळात कमर्शियल गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने ‘व्यवसाय कसा चालवायचा?’ असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
ग्राहकांच्या बुकिंगचे काय?
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील लग्नसराईसाठी नागरिकांनी आधीच मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. आता गॅस सिलिंडर न मिळाल्यास ग्राहकांना दिलेल्या शब्द कसा पाळायचा आणि जेवण कसे बनवायचे, या चिंतेत मालक आहेत. जर वेळीच पुरवठा सुरळीत झाला नाही, तर हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या:
मंगल कार्यालय व लॉन्स धारकांना कमर्शियल गॅस पुरवठ्यातून विशेष सूट मिळावी.
लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता तातडीने कोटा उपलब्ध करून द्यावा.
शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन आदेशात शिथिलता द्यावी.
या संकटामुळे केवळ मालकच नव्हे, तर केटरर्स, वेटर्स आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे शेकडो कामगार देखील अडचणीत आले आहेत. आता प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








