धुळे (प्रतिनिधी): धुळे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी प्रथम महापौर बाप्पुजी करणकाळ यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निरोप दिला आहे. “माझा नवीन राजकीय जन्म होत असून मी शिंदे यांच्या शिवसेना गटात जाहीर प्रवेश करत आहे,” अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
नांदणवान येथील माणुसकी पाहून भारावलो
आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना करणकाळ भावूक झाले होते. ते म्हणाले की, “नांदणवान या ठिकाणी मी हजारो लोकांची गर्दी आणि तेथील व्यवस्था पाहिली. तिथे सामान्य माणसाला पहिले प्राधान्य दिले जात होते. सर्वांसाठी अखंड समाज जेवण सुरू होते. रात्री १२ वाजता जरी कुणी जेवण मागितले तरी ते तत्काळ उपलब्ध होत होते. ही माणुसकी आणि सामान्यांबद्दलची ओढ पाहून मी भारावून गेलो आणि तिथेच पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवली.”
१० वर्षांची निष्ठा, पण आता नवी वाट
बाप्पुजी करणकाळ यांनी आपण ठाकरे शिवसेनेत १० वर्षे पूर्ण निष्ठेने काम केल्याचे सांगितले. ते म्हणाले:
“गेल्या १० वर्षात मी पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. माझ्यावर आजवर कोणीही एक रुपया घेऊन पक्ष बदलल्याचा आरोप करू शकलेला नाही आणि भविष्यातही करू शकणार नाही. मी रीतसर सर्व पदांचे राजीनामे ईमेलद्वारे पाठवले असून आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला माझा शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ आहे.”

भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम
पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील का? त्यावर त्यांनी अत्यंत रोकठोक उत्तर दिले. “मी एमआयएम (MIM) मध्ये जाईल, पण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी भाजप प्रवेशाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाप्पुजी करणकाळ यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पत्रकार परिषदेनंतर आता धुळ्याच्या राजकारणात नवीन समीकरणे पाहायला मिळणार आहेत.








